जिल्ह्यात चोवीस तासात 2 हजार 167 होम क्वारंटाईन

रत्नागिरी :- जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून लक्षणे नसलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 167 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबई आणि पुणे येथून येणारे चाकरमान्यांना कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न होत आहे.
जिल्ह्यात आतपर्यंत 4 हजार 423 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी 77 जण कोरोना पॉझिटीव्ह म्हणून समोर आले आहेत. तब्बल 3 हजार 401 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 2 स्वॅब नाकारण्यात आले, 4 स्वॅब अपुरे होते. अद्याप 939 अहवाल प्रलंबित होते.
  जिल्ह्यात येण्यासाठी 41 हजार 639 जणांनी अर्ज केले आहेत तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 49 हजार 32 जणांनी अर्ज केले आहेत. येणाऱ्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. मागील काही दिवसांपासून होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या  6 हजार 850 आहे. एका दिवसात 2 हजार 167 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 698 आहे.