जिल्हा बँकेची दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा बनावट पासवर्ड, युनिक आयडी साईन वापरुन ते खरे आहे, असे भासवून बँकेच्या आयडेन्टीटीचा गैरवापर करुन तशी फाईल आयडीबीआय बँकेत पाठवून जिल्हा बँकेची सुमारे १० लाख रु.ची फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचीच ऑनलाईन फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेचे उप व्यवस्थापक योगेश मोरे यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार   जिल्हा बँकेचे आयडीबीआय बँकेत खाते आहे.ज्यावेळी जिल्हा बँकेला आयडीबीआय बँकेत आर्थिक व्यवहार करायचा असतो, त्यावेळी जिल्हा बँकेमार्फत फाईल मेल केली जाते. त्यानंतर आयडीबीआय बँक व्यवहार  करते. मात्र दि.४ मे रोजी जिल्हा बँकेने कोणतीही फाईल पाठविलेली नसताना अज्ञात व्यक्तीने जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा बनावट पासवर्ड, युनिक आयडी साईन वापरुन ते खरे आहे, असे भासवून बँकेच्या आयडेन्टीटीचा गैरवापर करुन तशी फाईल आयडीबीआय बँकेत पाठवून जिल्हा बँकेची सुमारे १० लाख रु.ची फसवणूक करत, ती रक्कम बँकेच्या खात्यावरुन काढून घेतली.
योगेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भादंविक ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक अनिल लाड करत आहेत.