वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

रत्नागिरी :- गुरुवारी रात्री आठनंतर रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटाने वर्दी दिली. यानंतर रत्नागिरीत शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. पावसाची वर्दी मिळताच शहरी भागासह ग्रामीण भागात लाईट गुल झाली. वादळी पावसामुळे संगमेश्वरात कळबंस्ते हाक्रवणेमध्ये अंगावर विज पडून नारायण तावडे (४५) यांचा मृत्यु झाला.

 पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. गुरुवारी सायंकाळनंतर अवकाळी पाऊस बरसण्याची चाहूल लागली. रात्री आठ नंतर विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील वाहत होता.हळूहळू वाऱ्याने वेग पकडला. शहरासह ग्रामीण भागातील लाईट गायब झाली होती. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान मलदे वाडीतुन मजुरी करुन घरी जात असताना धरणाजवळ विज पडली व त्यामध्ये तावडे यांचा जागीच मृत्यु झाला. त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.