रत्नागिरी:- शहरातील एम. डी. नाईक हायस्कूल येथे क्वारंटाईन केलेला व्यक्ती बाथरूमच्या दरवाजातून उडी मारून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्वारंटाईन केलेल्या त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-खार परिसरातील रत्नागिरीत आलेल्या एका व्यक्तीला जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. त्यानंतर त्याला ५ जून २०२० पर्यंत शहरातील एम. डी. नाईक हायस्कूलमध्ये क्वारंटाईन केले होते. तसा शिक्कादेखील त्याच्या हातावर मारला होता.
क्वारंटाईन केलेल्या त्या व्यक्तीने भीतीपोटी पलायन करण्याचा निर्णय केला. त्यानुसार शाळेतील बाथरूमच्या दरवाजातून उडी मारून तो पळून गेला. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समाजामध्ये पसरविण्याच्या उद्देशाने व समाजातील लोकांना व जनतेला त्याचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हे माहित असूनदेखील नजर चुकवून पळून गेल्याने त्याच्या विरोधात विठोबा तुकाराम पारकर यांनी तक्रार दिली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविक २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८, ५१ (अ), साथीचे रोग प्रतिबंधक रोग कायदा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.