दापोलीतील पलायन केलेला कोरोना बाधित रुग्ण अखेर सापडला

दापोली:- तालुक्यातील बोरीवली वरची वाडीतील येथील शाळेतून क्वारंटाईन असताना पलायन केलेला कोरोना बाधित रुग्ण अखेर दुपारी जंगल परिसरात सापडला. काल रात्रीपासून पोलिस व ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली होती. आज दुपारी त्याला शोधण्यात यश आले.        

काल त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रात्री गाडी घेऊन रुग्णालयात आणण्यास गाडी व कर्मचारी शाळेत गेले होते तेंव्हा त्या रुग्णाने पलायन केले होते. बुधवारी  रात्री पासून त्याला शोधण्यासाठी प्रशासन कर्मचारी, पोलीस ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत होते. जंगल परिसरही शोधण्याचे काम सुरू होते. अखेर प्रशासन, ग्रामस्थांच्या शोधकार्यास यश आले. तो पॉझिटिव्ह युवक अखेर जवळपास बारा तासांनी सापडल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जवळच असलेल्या मोबाईल टॉवरच्या खाली हा युवक गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात पुढील उपचाराकरिता आणले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी दिली.