तब्बल 55 दिवसांनी उघडली रत्नागिरीतील बाजारपेठ

रत्नागिरी:- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संचारबंदी लागू झाली. या कालावधीत तब्बल 55 दिवस रत्नागिरीतील बाजारपेठ बंद राहिली. मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवार पासून रत्नागिरीतील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली. रोटेशन पद्धतीने बाजारपेठेतील दुकान सुरू झाली असून सर्व नियम पाळून व्यवहार सुरू झाले आहेत. 

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. रत्नागिरी जिल्ह्यात देखील या लॉकडाऊनची अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. रत्नगिरीतील बाजारपेठ 20 मार्च पासून बंद झाली. बाजारपेठ बंद झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. वाढत गेलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल 55 दिवस बाजारपेठ बंद राहिली. या दरम्यान हॉटेल्स आणि किराणा दुकानाना घरपोच धान्य किंवा पदार्थ देण्याची मुभा देण्यात आली होती.

दरम्यान प्रांताधिकारी यांनी रत्नागिरीतील बाजारपेठ रोटेशन पद्धतीने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी याबाबत निर्णय झाला. गुरुवारी सकाळी रामआळी, मारुती आळी, गोखले नाका यासह सर्व भागातील दुकाने रोटेशन पद्धतीने सुरू झाली. गुरुवारी रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सुरू झाली तर शुक्रवारी रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने उघडणार आहेत. दुकाने सुरू करताना सर्व नियम पाळून व्यवहार सुरू करण्यात आले असून खबरदारीच्या सूचनांचे बोर्ड दुकानाबाहेर झलकवण्यात आले आहेत.