रत्नागिरी :- शिक्षण विभागाकडून राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक 725 शाळा आहेत. मागील सरकारच्या काळात कमी पटाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यावर्षी शाळांची यादी जाहीर झाल्यामुळे त्या बंद करणार की काय अशी टांगती तलवार होती; मात्र तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ सुरु करण्यात जिल्हा परिषद शाळांचा वाटा सर्वाधिक आहे. त्या शाळांना बळ देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. शासनाकडून त्या शाळांना थेट निधी मिळत नसल्यामुळे देणगीदारांकडून अनेक शैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक महत्त्वाची भुमिका घेत आहेत. या परिस्थिती दोन वर्षांपुर्वी तत्कालीन सरकारने वीस पटापेक्षा कमी शाळा जवळच्या शाळेत समायोजीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ठिकठिकाणाहून विरोध झाला. तरीही काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात सरकार बदल झाल्यानंतर कमी पटाच्या शाळा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कोरोनामुळे राज्यात परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये कमी पटाच्या शाळांची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे गडबड उडाली आहे. रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या भागात कमी पट असला तरीही त्याची गरज आहे. त्या बंद झाल्या तर अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती आहे. शासनाकडून कमी पटाच्या शाळांची यादी तयार करण्याचे काम सुरु ठेवले होते. रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 5 वीच्या 314 तर 6 वी ते दहावीच्या 411 अशा एकूण 725 शाळा दहापेक्षा कमी पटाच्या आहेत. या शाळांबाबत कोणत्याही सुचना आलेल्या नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.