रत्नागिरी:- कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. लवकरच गोवा राज्याने खरेदी केलेली ‘ट्रुनेट’ मशीन रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी खरेदी केली जाईल. या मशिनमध्ये दिवसाला साडेतीनशे स्वॅब तपासले जातील. पण ही मशीन निगेटिव्ह रिपोर्टच देते. ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, त्याचे स्वॅब घेऊन ते मिरजला पाठविले जातील. अहवाल लवकर येऊन कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात आज कोरोना बाधित सापडलेल्या ठिकाणी 14 कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या बाधित झोनमध्ये सुमारे 4 हजार 915 कुटुंब आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत मुंबई सीपींच्या परवानगीने पास घेऊन आलेल्या चाकरमान्यांची संख्या 4 हजारावर आहे. अजूनही ती वाढत आहे. अजून 1200 स्वॅब पाठविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बाधितांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही, हे लोक क्वारंटाईन आहेत. मिरज येथील लॅबवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे मर्यादीत नमुने पाठवावे लागतात. त्याचा अहवाल यायलाही उशिर होतो. म्हणून आम्ही गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रुनेट’ मशिन खरेदी करणार आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येक एक मशिन असेल. जिल्हा रुग्णालयात ती बसविण्यात येणार आहे. मात्र तिचे वैशिष्ट्य असे आहे की ती निगेटिव्ह अहवाल एवढाच अहवाल देते. त्यामुळे मशिन ज्याचा अहवाल देणार नाही, त्याचे स्वॅब घेऊन मोजकेच तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात येतील. त्यामुळे त्या लॅबवर ताण पडणार नाही आणि अहवालही लवकर मिळेल. येत्या आठ दिवसामध्ये ही मशिन येईल.