लोकप्रतिनिधींचा आग्रह जिल्हावासीयांसाठी मारक

रत्नागिरी :- मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्याचा लोकप्रतिनिधींचा आग्रह जिल्हावासीयांच्या अंगलट आला आहे. गेली दीड महिना कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाने चांगले नियंत्रण मिळविले होते. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जिल्हा प्रशासनाने ही ते स्पष्ट केले आहे. 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

प्रशासनाची परवानगी न घेता चाकरमानी जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश करत आहे. प्रशासनावर कोणाचा राजकीय दबाव आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. सोशल मीडियावर याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. रत्नागिरी सुरक्षित ठेऊन चाकरमान्यांबाबत योग्य तपासणी आणि व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यात घेण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. 

जिल्हा प्रशासनाची हतबलता काल लक्षात आली. प्रशासनावर मोठा दबाव असल्याचे यावरून स्पष्ट दिसत होते. कारण गेली दीड महिने प्रशासनाने केलेल्या कामाचे जनतेने कौतुक केले होते. फेसबुक लाइव्हला हे स्पष्ट दिसत होते. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य कर्मचार्‍यांचे तोंडभरून कौतुक झाले होते. संपुर्ण रत्नागिरीकर त्यांच्या पाठिशी ठाम उभे होते. मात्र गेल्या पाच दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडत गेल्या की जिल्हा प्रशासनाच्या हातून परिस्थिती निसटत चालल्याचे सूतोवाच जिल्हाधिकार्‍यांनी केले. नियंत्रणात आलेला कोरोनाचा संसर्ग मंडणगडमध्ये एकदम 11 रुग्ण सापडल्यानंतर सुटला. त्यानंतर दिवसाला कोरोनाचे चार, पाच रुग्ण आढळू लागले. जिल्ह्यात आज 52 रुग्ण आहेत. त्यात कशेडी घाटात चाकरमान्यांचा लोंढा पाहुन प्रशासन गोंधळले आहे. येणार्‍या चाकरमान्यांच्या तुलनेत जिल्ह्यांत त्यांना क्वारंटाईन करण्यापासून त्यांची खाण्याची, पाण्याची, राहण्याची व्यवस्था डळमळीत आहे. आरोग्य यंत्रणा देखील कमी पडत आहे. 

त्यात स्वॅब तपासण्यास मिरजने येथील केंद्राने नकार दिल्याने दुसरे मोठे संकट जिल्ह्यापुढे उभे आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजाराच्या वर नमुने प्रलंबित आहेत. आता अत्यावश्यक 200 नमुने तपासले जाणार आहेत. परंतु भविष्यात जिल्ह्यात दाखल होणार्‍या चाकरमान्यांच्या नमुन्यांचे काय? त्यांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ आहे का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. ज्या राजकीय नेत्यांनी चाकरमान्यांना आणण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. ते आता या गंभीर परिस्थित कुठे आहेत, असा सवाल जनता करत आहेत. प्रशासन हताश का झाले याची कारणं देखील शोधण्याची गरज आहे.