रत्नागिरी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी श्रेया केळकर यांची निवड

रत्नागिरी :- सामाजिक कार्यासाठी जगभरातील 210 देशांमध्ये सेवाभावी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रत्नागिरी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी रत्नागिरीतील नामवंत सामाजिक कार्यकर्त्या श्रेया केळकर यांची 2020 /21 या वर्षा करिता बहुमताने निवड करण्यात आली आहे. 

तसेच क्लबच्या सचिवपदी मनाली राणे व खजिनदारपदी रत्नागिरीतील नामवंत डॉक्टर शिवानी पानवलकर यांची निवड करण्यात आली आहे. क्लबच्या पदाधिकारीपदी रत्नागिरीतील या कर्तबगार सुविद्य सामाजिक महिला कार्यकर्त्यांची निवडीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रेया केळकर यांनी अध्यक्षपदी माझी झालेली निवड हा माझा बहुमान समजते. लायन्स क्लबतर्फे रत्नागिरीतील लोकांसाठी आवश्यक ती सर्व चांगली सेवाकार्य आम्ही आयोजित करू असा विश्वास व्यक्त केला. लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण, सुधीर वणजू, डॉ. शेखर कोवळे, डॉ. बेडेकर व सर्व लायन्स परिवार यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे