प्रतिकूल परिस्थितीतदेखील सांभाळली गस्त

रत्नागिरी :- एकीकडे कारवाईचा दबाव आणि दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ.. असलेल्या मनुष्यबळात महिला अधिकाऱ्यांची संख्या अधिक असे असतानाही प्रतिकूल अशा परिस्थितीत मत्स्य व्यवसाय विभागाने गस्त राबवली. गेल्या 20 दिवसातील दिवस-रात्र कामामुळे काही अधिकार्‍यांची प्रकृतीही खालावू लागली आहे.

केंद्राच्या अखत्यारितील म्हणजे साडेबारा नॉटीकल मैल अंतराबाहेरच्या समुद्रात पर्ससीन नेट मच्छिमार नौका मासेमारीसाठी जात आहेत. या नौका बंदरांवर मासळी उतरवण्यासाठी येतात. यामध्ये कोणती बेकायदेशीर मासेमारी झाली आहे का? लॉकडाऊन नियमांचे पालन होते आहे की नाही? हे पाहण्यासाठी मिरकरवाडा आणि साखरीनाटे बंदरांवर मत्स्य व्यवसाय विभागाची पथके कार्यरत आहेत. परवाना अधिकारी, पोलिस, सुरक्षा रक्षक आदींचा या पथकात समावेश आहे. समुद्रातील गस्तही सुरू आहे. यातून गेल्या 20 दिवसात सुमारेे 20 नौकांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. 

पथकांमध्ये काम करणार्‍या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसह परवाना अधिकार्‍यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. तीन महिला अधिकार्‍यांची लहान मुले आहेत. त्यांना घरी एकटे सोडून कर्तव्य बजावले जात आहे. परंतु, स्थानिक पातळीवर काही मंडळी येथील मासेमारीसंदर्भात संभ्रमात्मक माहिती मुंबईतील नेत्यांना पुरवत आहेत. त्यातून शासनाकडे अर्ज किंवा तक्रारी होऊ लागल्याने पथकातील अधिकारी वर्गाचे मनोधैर्य ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे.
अवैध मासेमारी होऊ नये तसेच बंदरांवर सुरक्षित वैयक्तिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे या नियमांचे पालन होते आहे की नाही हे सुद्धा पाहिले जात आहे. 24 तास ड्युटी होत असून, यातून होणार्‍या अती ताणामुळे काही अधिकार्‍यांची प्रकृती बिघडू लागली आहे. तरीही गेल्या 20 दिवसात सुमारे 20 मच्छिमार नौकांवर कारवाईसुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.