रत्नागिरी :- पॉझिटीव्ह रुग्ण महिलांना रत्नागिरीत आणून सोडणार्या आंबा वाहतूक करणार्या टेम्पो चालकाचा शोध लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. तो टेम्पो चालक कुवारबाव येथील आहे. त्या टेम्पोचालकासह पॉझिटीव्ह सापडलेल्या कर्ला, सोमेश्वर येथील त्या महिला आणि त्यांना साह्य करणारा आणखी एक अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चालकासह दोघांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. टाळेबंदी जाहीर केली असून जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या आहेत. आंतरजिल्हा वाहतूकीसाठी ई-पासची व्यवस्था केली गेली आहे. असे असतानाही मुंबईतील अनेकजण ई- पास नसतानाही चाकरमान्यांना रत्नागिरीत आणून सोडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने दंड थोपटले होते. वडाळा मुंबई येथून दोन महिला एका टेम्पोतून 8 मे रोजी रत्नागिरी माळनाका येथे आणून सोडले. त्या दोन्ही महिला मुंबईतून आल्यामुळे स्वतःच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरु झाला. दोन दिवसांनी तो टेम्पो कुवारबावचा असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. टेम्पो चालक कृष्णा विराप्पा सुरणकर (रा. गराटेवाडी, कुवारबाव) आणि रफिक मुल्ला (रा. एमआयडीसी) या दोघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुरणकर हा मुुंबईतून आंबे वाहतूक करतो. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे.