6 कोटी 12 लाखाचा डिझेल परतावा मंजूर; ना. सामंतांच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी :- कोरोना संकटात जिल्ह्यातील मच्छिमारांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेलवरील परताव्याच्या रक्कमेला वित्त विभागाने परवानगी दिली असून ती रक्कम येत्या काही दिवसांत मच्छिमारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 6 कोटी 12 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
डिझेलवरील परताव्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या 110 कोटींच्या निधीपैकी फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत 78 कोटी डिझेल परताव्याचा निधी वितरीत करण्यात आला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उर्वरीत 32 कोटींपैकी 19.35 कोटीचा निधी उद्भवलेल्या ’कोरोना’ आपत्तीमुळे सरकारने प्राधान्यक्रम देयकानुसार रोखून धरला होता. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकट काळात मच्छिमारांना दिलासा मिळावा म्हणून मत्स्यव्यवसाय विभागाने वित्त विभागाकडे पाठपुरावा केला होता.
डिझेल परतावा वाटपास वित्त विभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधीचे निर्देश संबंधित  देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरासाठीचा 12 कोटी 65 लाख रुपयांचा निधीचे धनादेशही सहायक आयुक्तांकडे जमा करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वरीष्ठपातळीवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जिल्ह्यासाठी 6 कोटी 12 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसे पत्र सहाय्यक आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले आहे. लवकरच ती बीडीएसवर दिसून येईल असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.