चौपदरीकरणाच्या भरावाचा यावर्षी देखील धोका

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणा-या कंत्राटदाराने आंजणारी (ता. लांजा) येथील काजळी नदीच्या किना-यालगत गतवर्षी मोठ्या प्रमाणात माती, दगड यांचा भराव आणून टाकल्याने या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह विरूध्द बाजुच्या किना-याला वाढून तेथील घरांसह पुनसकोंड, कुर्णे जि.प. रस्त्याखालील भरावही पावसाळ्यामध्ये धुपून जाऊन, मोठा धोका निर्माण झाला होता. तसेच महामार्गावरील आंजणारी नदीवरील पुलाच्या खांबांनाही धोका पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. तरीही त्यांनी आदेश देऊनही पुढील पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून  कोणतीही उपाययोजना करुन घेतली नसल्याने या पावसाळ्यात हा धोका वाढण्याची भीती आहे.
या प्रकाराबाबत कुर्णे ग्रा.पं.हद्दीतील स्थानिक रहिवासी मनोहर कदम, बाब्या दाभोळकर यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या एमईपी या तत्कालीन ठेकेदार कंपनीने गतवर्षी काम करताना माती, मोठे दगड, झाडांचे बुंधे यांचा भराव आणून आंजणारी पुलानजीक काजळी नदीच्या किना-यालगत निवसर रस्त्याच्या बाजूस टाकल्याने, आपोआप नदीचा समतोल वाहणा-या पात्राच्या प्रवाहात अडथळा येऊन, तो प्रवाह विरूध्द बाजुच्या किना-यालगत प्रवाहीत होऊन, तेथील कुर्णे ग्रा.पं. हद्दीतील ५ घरांना पुराचा वारंवार धोका निर्माण झाला होता. तसेच किना-यालगतच्या पुनसकोंड-कुर्णे या दोन गावाच्या रस्त्याच्या खालील भरावाचा भागही धुपून गेला होता. तेथील ग्रामस्थ, विद्यार्थी जीव मुठीत घेऊन, या उपलब्ध एकमेव मार्गाने प्रवास करीत आहेत़ तसेच याचठिकाणी काजळी नदीवरील आंजणारी येथील महामार्गावरील मुख्य पुलाच्या खांबांनाही या भरावामुळे पात्र बदलून पाण्याचा वेग व वाढलेली फुग यांचा फटका बसून, दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या अगोदर याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अर्ज केल्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी संबंधित महामार्ग ठेकेदाराला तो भराव काढण्याबाबत सांगितले होते. तरी त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. आदेश देऊनही पुढील पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून  कोणतीही उपाययोजना करुन घेतलेली नाही आहे. तरी दुर्घटना घडण्याच्या अगोदर याकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.