एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी पार पाडत डॉक्टर दाम्पत्याचा कोरोना विरोधात लढा

रत्नागिरी :- सध्या देशात कोरोनाचं संकट आणखीनच गडद झालेलं आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. प्रशासनावरही त्याचा ताण वाढत आहे. मात्र यामध्ये सगळ्यात जास्त कसरत करावी लागतेय, ती आरोग्य आणि पोलीस विभागात काम करणाऱ्या महिला वर्गाला. एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब हे दोन्ही सांभाळताना त्यांना खूप कसरत करावी लागतेय, वेळेत घरी जाता येत नाही, मुलांना वेळ देता येत नाही याची खंत असली तरी प्रथम देशसेवा असं म्हणत या महिला आपलं कर्तव्य बजावत आहेत. 

अशाच एक आहेत डॉ संघमित्रा महेंद्र गावडे/फुले.. कान, नाक, घसा तज्ञ असलेल्या डॉ. फुले मॅडम गेली 20 वर्ष शासकीय सेवेत आहेत. सध्या त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहेत. तर त्यांचे पती महेंद्र गावडे हेही डॉक्टर. महेंद्र गावडे हे रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी आहेत. हे दोघंही आपलं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेरच असतात. या दाम्पत्याला एक सहा वर्षांची मुलगी आहे. पण आपल्या कामामुळे डॉ. फुले यांना आपल्या विदिशाला जास्त वेळ देता येत नाही. दोघेही घराबाहेर असल्यामुळे विदिशाला दिवसभर केअर टेकरकडे ठेवावं लागतं. त्यात सध्या कोरोना. त्यामुळे सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खूपच काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आईबाबा आपल्याला वेळ देत नाहीत ही विदिशाची तक्रार आहे.
 

डॉ. संघमित्रा फुले या सध्याच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात जोखमीचे काम म्हणजेच रुग्णांचे स्वाब घेण्याचं काम करतात. खूप काळजीपूर्वक संशयित रुग्णांचे स्वाब घेण्याचं  काम त्यांना करावं लागते. त्याशिवाय वार्डमध्ये जाणे, पेशंट तपासणे हेही त्या करत असतात. त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यानंतर पहिल्यांदा स्नान करून त्यानंतर पूर्ण घर निर्जंतुकीकरण करतात. आणि त्यानंतरच केअर टेकरकडून विदिशाला घेऊन येतात. आम्ही आईवडील दोघेही दिवसभर बाहेर असल्याने विदिशा खूप व्याकूळ असते आम्हाला भेटण्यासाठी.. आम्ही तिला वेळ देत नाही ही तिची नेहमी तक्रार असल्याचं डॉ. संघमित्रा फुले सांगतात. रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्याने विदिशाला जवळ घेऊन झोपताही येत नाही. त्यामुळे हा खरंतर तिच्यावर एक आघात असल्याचं डॉ फुले म्हणतात.

मात्र हळूहळू ती सर्व हे ऍडजस्ट करत आहे. कोरोना काय आहे हेही तिला कळायला लागलं आहे. त्यामुळे कोरोना कधी जाणार हे सारखं विदिशा विचारत असते. पण आता ती हे सर्व समजून घेत असल्याचं डॉ फुले मॅडम म्हणतात.
सध्याच्या परिस्थितीत घरात काम करण्यासाठीही कोणी कामवाली ठेवता येत नाही, त्यामुळे घरची सर्व कामं, रुग्ण सेवा हे सर्व करताना डॉ. संघमित्रा यांना कसरत करावी लागते. त्यात सध्या सुट्टीही घेता येत नाही, त्यामुळे विदिशाला वेळही देता येत नाही. अशा सर्व परिस्थितीत एक आई आपलं कर्तव्य बजावत असताना मुलीला मात्र वेळ देता येत नाही, याची खंत डॉ. संघमित्रा यांना आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे आपण कोरोनाच्या लढाईत अग्रेसर असणाऱ्या आरोग्य विभागात काम करताना देशासाठी आपणही खारीचा वाटा उचलत असल्याचं समाधान डॉ. संघमित्रा यांच्या चेहऱ्यावर दिसते.