डोकेदुखी वाढली; आंब्याच्या टेम्पोतुन कोरोना पॉझिटीव्ह महिलांचा प्रवास 

रत्नागिरी:- रविवारी रत्नागिरीत चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. या चौघांपैकी दोन महिला या आंब्याच्या टेम्पोतुन रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. टेम्पोवाल्याने महिलांना माळनाका येथे सोडल्यानंतर या महिला जिल्हा रुग्णालयात स्वतःहुन दाखल झाल्या. या महिला कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर आता त्या टेम्पोवाल्याचा शोध यंत्रणा घेत आहे.  

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 42 जण कोरोना बाधित आढळले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईकर चाकरमानी आहेत.  अशातच वडाळा येथून आलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. या दोन महिलांनी 7 मे रोजी वडाळा येथून प्रवास सुरु केला. वडाळा ते चेंबूर असा प्रवास त्यांनी टॅक्सीने केला. चेंबूर येथून त्या आंब्याच्या ट्रकमध्ये बसल्या. 8 मे रोजी त्या रत्नागिरीत माळनाका येथे दाखल झाल्या. 8 मे रोजी सकाळी त्या स्वतःहुन जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या. त्यांना तात्काळ आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले. रविवारी या दोघांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.  यानंतर यंत्रणेची पुरती झोप उडाली आहे. या दोन महिलांना रत्नागिरीत एका आंबा वाहतूकवाल्याने आणल्याचे समोर आले आहे. त्या चालकाचे नाव त्या महिलांना माहीत नसून तो केवळ आंबेवाला होता असे त्या महिलांनी सांगितले आहे. तो ट्रकवाला राहतो कुठे याचा शोध आता यंत्रणा घेत आहे.