रत्नागिरी :- उन्हाच्या कडाक्याबरोबर टंचाईची तिव्रताही वाढू लागली असून जिल्ह्यात टँकरग्रस्त वाड्यांची शंभरी पूर्ण झाली आहे. 53 गावातील 105 वाड्यांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. 10 हजार 47 लोकांना टंचाईची झळ बसत आहे.
पारा दिवसेंदिवस 36 अंश सेल्सिअसपर्यंत वर चढत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाकाही तेवढाच जाणवू लागला आहे. परिणामी पाणीसाठ्यांचे बाष्पीभवन वाढू लागले असून जमिनीतील पाण्याची पातळीही घटत आहे. त्यातून टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्यात तीस वाड्यांची भर पडली असून पुढील पंधरा दिवसात मोठ्याप्रमाणात टँकरची मागणी होणार आहे. बाधित लोकांची संख्याही वाढलेली आहे. सर्वाधिक टंचाई खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या तिन तालुक्यांना भासत आहे.
टंचाई आराखड्यात सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांना कोरोनामुळे दिरंगाई होत आहे. त्यातून टँकर हा एकमेव पर्याय प्रशासनापुढे उरलेला आहे. टंचाईग्रस्त भागात विंधनविहीरी उभारण्यात येतात; मात्र संमतीपत्राअभावी ही योजना बारगळली. दोनच दिवसांपुर्वी त्याला पर्याय म्हणून हमीपत्र घेतले जाणार आहे. त्याचे काम सुरु आहे. पण प्रत्यक्ष खोदाईला उशिराने सुरवात होणार आहे. त्याचबरोबर नळपाणी योजना दुरुस्तीचे 90 मंजूर प्रस्तावातील कामे सुरु करण्यासाठी अजून आठवडाभर लागणार आहे. या अडचणींवर मात करत प्रशासन टंचाईग्रस्त भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न करत आहे. टँकरला त्वरीत परवानगी मिळावी यासाठी फोटो किंवा व्हिडीओचा आधार घेऊन प्रांताधिकार्यांना अधिकार दिले आहेत. नऊ पैकी सहा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर हे तिन तालुके टँकरमुक्त ठेवण्यात यश आले आहे. रत्नागिरी तालुक्यात पंचायत समितीने उत्तम नियोजन केले आहे. ज्या ठिकाणी टंचाई जाणवते, तिथे पर्यायी व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनतरी गावागावात पाण्याचे नियोजन करण्यात यश आले आहे.