रत्नागिरी :- रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पनवेलहून रत्नागिरीच्या दिशेने येणारी मालगाडीचे सात डबे घसरले. हा अपघात दिवाणखवटी ते खेडच्या दरम्यान घडला आहे. रुळ पूर्णतः तुटून गेलेले असून मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परराज्यातून येणारी मालगाडींची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. गुजरात येथून धान्य तर अलिबागमधून खतांचा पुरवठा केला जात आहे. दुपारच्या सुमारास दिवाखवटी येथे रत्नागिरीकडे येणार्या मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले. डबे घसरल्याच्या आवाजाने आजूबाजूला काम करणारे काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात घडल्याची माहिती रत्नागिरी स्थानकातील भोंगा तीन वेळा वाजल्यामुळे लक्षात आली. त्यानंतर यंत्रणा कार्यान्वित झाली असून अपघातासाठी वापरण्यात येणारी व्हॅन घटनास्थळी रवाना झाली. अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. सात डबे घसरल्यामुळे रुळांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी हा मार्ग पुढील काही तास बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्या मालगाडीमध्ये धान्याचा साठा असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे.