22 जणांची यादी करा आणि थेट घर गाठा

रत्नागिरी :- राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक अडकून पडले आहेत. त्या सर्वांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी या लोकांनी 22 जणांची एक यादी करावी. यादीत असलेल्या 22 जणांना मोफत त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे.

शहरातील लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती नोंदवायची आहे. 22 जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी. सोमवारपासून प्रत्येकाला आपल्या गावी जाता येणार असून त्यासाठी कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं.

एसटीत केवळ २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असेल. मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश असेल, असं सांगतानाच कुणीही पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात परवानगी मिळावी म्हणून गर्दी करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. तसेच कुणालाही कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रवासापूर्वी आणि नंतर एसटीचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही सुविधा 18 मे पुर्वीपर्यंतच आहे.