ई – संजिवनी ओपीडी सेवा कार्यान्वित
रत्नागिरी :- लॉकडाऊनमुळे सध्या कुणालाही घराबाहेर पडणे शक्य नाही. अशा स्थितीत कोरोनामुळे विविध रुग्णालयाच्या ओपीडी उपलब्ध नाहीत. या काळात मधुमेह, रक्तदाब आदि व्याधी असणाऱ्या रुग्णांसाठी आता घरबसल्या वैद्यकीय सल्ला देणारी ऑनलाइन ओपीडी ई संजीवनी कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ई संजीवनी ओपीडी घरबसल्या मोबाईलवर सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या वेळेत सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. अनेकांना रूग्णालयात जाणे शक्य नाही, त्यामुळे औषधे संपले आहेत त्यापैकी कोणती सुरू ठेवायची, कोणती बंद करायची असे सवाल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. अशा प्रश्नांची उत्तरे मोबाईलवर आपणास या ई संजीवनी ओपीडी द्वारे मिळतील. ई संजीवनी ओपीडी चा लाभ घेण्यासाठी esanjeevaniopd.in या संकेत स्थळावर आपल्या मोबाईल द्वारे नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यावर आपला प्रश्न आपण विचारल्यावर आपणास ऑनलाईन संवाद साधून डॉक्टर सल्ला देतील व घरबसल्या आपल्या आरोग्य समस्येची समाधान होऊ शकेल. प्रिस्क्रिप्शन खेरीज औषधे दिली जात नाहीत. म्हणून रुग्णांना मोबाईलवरच औषधाची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन ) मिळणार आहे. रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.