तामिळनाडू, कर्नाटकातील 150 कामगार घरी जाण्यासाठी आक्रमक

रत्नागिरी :- लॉकडाउनमुळे येथील एमआयडीसीतील अडकलेल्या तामिळनाडू, कर्नाटकातील सुमारे 150 कामगार राज्यात परत जाण्यासाठी चांगलेच उतावीळ झाले आहेत. आतापर्यंत जेवणाची व्यवस्था झाली परंतु आता परत जाण्यासाठी पैसाच नाही. त्यामुळे हताश झालेल्या या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल केली. मात्र पोलिसांना याची खबर मिळताच त्यांना आरोग्य मंदिर येथे रोखले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे आणि पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी योग्य शिष्टाई करून तीन दिवसात निर्णय देण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे ते कामगार परतले. 

शहरातील एमआयडीसी भागात एका आस्थापनेत 450 मुले आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील कामगारांचा समावेश आहे. सुमारे 540 मुले एका आस्थापनेचे मार्केटिंगचे करतात. लॉकडाउनमुळे त्यांचे हे काम बंद झालेले आहे. मुलांची राहण्याची सोय असली तरी जेवणाचे हाल होतेच. मात्र तहसील कार्यालय, विविध संस्था, शिवभाजन योजना आदीमधुन या मुलांच्या जेवणाची सोय केली जात होती. मात्र आता या मुलांकडे आता पैसाच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मूळ गावी जाण्यासाठी ते प्रचंड उतावीळ आहेत. त्यासाठी प्रशासनाने आमच्या परतीच्या प्रवासाची सोय करावी, म्हणून आज सकाळी तामिळनाडूतील सुमारे 150 मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारण्याचा निर्णय घेतला. साळवी स्टॉप येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होता. मात्र पोलिस यंत्रणेला माहिती मिळताच त्यांना आरोग्य मंदिर येथे रोखण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे व निरीक्षक लाड यांनी त्या कामगारांची समजूत काढली. तीन दिवसात याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. हा विश्‍वास मिळाल्यानंतर मुलांना पुन्हा एमआयडीसीत पाठविले. 

टाळेबंदीच्या काळात अपुर्‍या सुविधांमुळे बेजार झालेल्या एमआयडीसीतील सुमारे दीडशे कामगार रस्त्यावर उतरले. मात्र जमावबंदी आदेश धाब्यावर ठेवत ते एकत्र आले होते. जिल्हा प्रशासनाने काही सवलत दिली असली तरी सोशल डिस्टन्स आणि कायद्याला धरून हे नसल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.