काजू बागायतदारांना दिलासा;  विक्रीसाठी यंत्रणा

रत्नागिरी:- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हापूसचे मार्केटिंग आणि वितरणात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मा विभागाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली होती. त्यातून राज्यभरातील एक लाख ग्राहकांचा डाटा तयार झाला आहे. त्याचा उपयोग रत्नागिरीत उत्पादित होणार्‍या व प्रक्रिया केल्या जाणार्‍या काजूसाठी केला जाणार आहे. स्वतःच काजू प्रक्रिया करून घेऊन त्याचे मार्केटिंग या माध्यमातून करण्याचा निर्णय आत्माने केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यात सध्या चांगल्याप्रकारे यश आले आहे. 

आत्मा विभागाकडून केलेल्या अभ्यासानुसार एक टन काजू बी प्रक्रिया करण्यासाठी 30 हजार रुपये खर्च येतो. त्यातून अडीचशे किलो प्रक्रियायुक्त काजू मिळतो. एका किलोला काजूगरासाठी 800 ते 1100 रुपये दर मिळतो. कोकणातील काजू गरांना बाजारात चांगली मागणीही आहे. एका टनातून शेतकर्‍याला किमान अडीच लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा जाता 70 टक्के नफा यामधून मिळू शकतो. तयार झालेला काजू विक्रीसाठी थेट यंत्रणाही उपलब्ध असल्यामुळे शेतकरी गटांना याचा फायदा चांगल्याप्रकारे मिळणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे.