शहरातील पोलिस बंदोबस्त शिथिल; ग्रामीण भागात करडी नजर

रत्नागिरी :-लॉकडाउनमधून जिल्हा प्रशासनाने काही सवलती दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरू झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त कमी केला आहे. त्यातील बहुतेक बंदोबस्त ग्रामीण भागाकडे वळविण्यात आला आहे. मात्र जिल्ह्याच्या आणि त्या-त्या गावाच्या सीमा, पॉइंटवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
शासनाने रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन तयार केले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. मात्र कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हातखंब्यापासून रत्नागिरी शहरापर्यंत सुमारे पाच ते सात पॉइंट तयार करण्यात आले होते. परजिल्ह्यातून येणार्‍यांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवाच सुरू होती. त्यामुळे 24 तास सुमारे 50 ते 55 पोलिस अधिकारी, कर्मचारी 40 दिवस राबत होते. या झोनमध्ये जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपासून काही सवलती दिल्या आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास मुभा आहे. दुचाकी आणि चारचाकीलाही परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवेबरोबर काही दुकानं उघडण्यास सवलत दिली आहे. याचा सारासार विचार करून शहर आणि परिसरातील पोलिस बंदोबस्त कमी करण्यात आला आहे. 
कमी केलेला हा बंदोबस्त ग्रामीण भागाकडे वळविण्यात आला आहे. लपून छपून येणार्‍यांमुळे काहीसा वाद-विवाद होत आहे. त्यामुळे रात्रीची गस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ग्रामीण भागाकडे 60 ते 70 टक्के कर्मचारी वळविला आहे. मात्र जिल्ह्यातील, शहरातील सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातखंबा, कुवारबाव आदी ठिकाणी चेक पोस्ट कायम आहे. वाहतूक पोलिस शहरात बंदोबस्ताला आहेत, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.