रत्नागिरी जि. प. त जाधव काका-पुतणे आमने-सामने

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील रस्त्याच्या कामावरुन जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव आणि बाळशेठ जाधव यांच्यात जुगलबंदी रंगली. झालेल्या कामांपेक्षा अधिकचे पैसे काढून दिल्याचा ठपका विक्रांत यांनी ठेवला तर त्यांचे आरोप बाळशेठ यांनी पुसून टाकले. या प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल अशा सुचना करत अध्यक्ष रोहन बने यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दोनवेळा रद्द झालेली जिल्हा परिषद स्थायी समिती शुक्रवारी (ता. 8) रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. सभागृहात कमीत कमी लोकांचा सहभाग ठेवत सोशल डिस्टसिंगची व्यवस्था केली होती. व्यासपिठावर गर्दी टाळण्यासाठी सभापतींना बसण्याची व्यवस्था वेगळी केली होती. तुरभंव येथील रस्त्याचे काम बीबीएमपर्यंत झाले होते; मात्र त्याचे बिल देताना खर्च झालेल्या रकमेपेक्षा अधिक दिल्याचे विक्रांत जाधव यांनी सभागृहात मांडले.

हा विषय बाळशेठ जाधव यांनी खोडून काढत तसे झालेच नसल्याचे सभागृहापुढे मांडले. त्यावर विक्रांत यांनी सुरवातीला कामाची एमबी ग्रामपंचायतीत उपलब्ध नव्हती असा अहवाल दिला होता. जिल्हा परिषदस्तरावरुन चौकशी लावल्यानंतर ती एमबी सादर करण्यात आली होती. या प्रकाराची सविस्तर चौकशी करुन शासनाचे पैसे वाया जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे विक्रांत यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाकडून एमबी सादर न केलेल्या प्रकाराची चौकशी लावण्यात आली होती असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा जाधव यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणी सविस्तर माहिती घेण्यात येईल असे अध्यक्ष बने यांनी सांगितले.