जिल्ह्यातील 132 प्रवासी घरच्या दिशेने रवाना

रत्नागिरी:- गेली चाळीस ते पंचेचाळीस दिवस घरच्यापासून दुरावलेले परजिल्ह्यातील प्रवासी लालपरीने (एसटीने) घरच्या प्रवासाला लागले आणि आनंदाने त्यांचा चेहरा फुलल्याचे चित्र आज पहायला मिळाले. लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी जिल्ह्यातून आज विशेष 6 बस सोडण्यात आल्या. प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टन्सिचे पालन करून 22 प्रवासी पाठविण्यात आले. 
लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या  नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी विनंती अर्ज केले होते. नागरिकांना  यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून  विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करू दिली. त्यानुसार जिल्ह्यातून आज सहा बसेस सोडण्यात आल्या. रत्नागिरी बस स्थानकातून रायगड आणि सिंधुदुर्गसाठी दुपारी बस सोडण्यात आल्या. त्याशिवाय चिपळूण बस स्थानकातूनही सिंधुदुर्ग आणि रायगडसाठी बस सोडण्यात आल्या.  दापोली बस स्थानकातूनही रायगडसाठी बस सोडली. तर लांजा बस स्थानकातून सिंधुदुर्गसाठी बस सोडण्यात आली.. या प्रत्येक बसमधून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून फक्त 22 प्रवासी पाठविण्यात आले.
दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी या नागरिकांची लगबग दिसून येत होती. प्रत्येकाने मास्क वापरले होते. तसेच एसटी विभागाकडून पाणी, जेवण व बिस्कीटपुडा या प्रवाशांना देण्यात आला. घरी परतण्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडुन वाहत होता. एक वेगळे समाधान त्यांच्या मनात दिसत होते.  उद्या (ता. 9) देखील सिंधुदुर्ग, रायगड, बुलढाणा, लातूर, सातारा, भंडारा या जिल्ह्यांसाठी 16 बसचं नियोजन करण्यात आलं आहे. तर रविवारी गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांसाठी तीन बसेस जिल्ह्यातून सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.