कोरोना प्रतिबंधासाठी आंबा व्यावसायिकांचे सकारात्मक पाऊल

रत्नागिरी:- आंबा वाहतूकदार कोरोना प्रसारासाठी कारणीभूत ठरू नयेत यासाठी बागायतदारांनी सकारात्मक पाऊल उचलली आहेत. आंब्याची वाहतूक करणाऱ्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे.तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था देखील गोडावून मध्ये केली जाणार आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या उपस्थितीत आंबा बागायतदारांची बैठक झाली. यावेळी प्रसन्न पेठे, राजेंद्र कमद, राजू पेडणेकर, आंबा वाहून नेणारे ट्रान्सपोर्टरचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंबा वाहतूक करणार्‍या गाड्यांमधून मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. याची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली होती. दोन गुन्हेही दाखल झाले आहेत. कोरोनामुळे आंबा बागायतदार अडचणीत येऊ नयेत यासाठी शेतमाल वाहतूक आणि विक्री सुरुच ठेवण्यात आली होती. जिल्ह्यातील बहूतांश बागायतदार पारदर्शकपणे शासनाच्या दिलेल्या सुचनांचे पालन करत आहेत; मात्र काही मोजक्याच चालकांकडून गैरफायदा घेण्यात आला होता. मुंबई, पुण्यासारख्या रेडझोनमधून आंबा पोचवून येणार्‍यांसाठी बागायतदारांकडूनच काळजी घेण्यात येत आहे. वाहतुकदारांच्या गाड्या परजिल्ह्यातून रत्नागिरीत आल्यावर चालक आणि मदतनीस यांनी सरसकट लोकांमध्ये मिसळू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्या लोकांना गोडावून किंवा पॅकहाऊसच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. हंगाम संपल्यानंतर त्यांची तपासणी करुन घरी पाठविण्यात येईल. त्यांची निवासाची व्यवस्था बागायतदार करणार आहे.

आंबा हंगाम सर्वसाधारण 20 ते 25 दिवसात संपुष्टात येईल असे चिन्ह आहे. कोरोनाचा प्रादुर्भात होण्यापुर्वी अनेक नेपाळी गुरखे आंबा बागायतदारांकडे दाखल झाले आहेत. हंगाम संपल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यापुर्वी संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
आंबा तोडणीसाठी गाड्या पाठविताना एक चालक आणि चार कामगार ठेवणे आवश्यक आहे. पेट्या घेऊन जाताना प्रत्येक गाडीसोबत स्वयं घोषणापत्र बाळगावी. जेणेकरुन ती गाडी आंबा बागायतदारांची आहे, हे समजू शकेल. संबंधित चालकांकडून गैरफायदा घेतला गेला, तर त्याची माहिती समजणे शक्य होईल.