रत्नागिरी:- कोरोनामुळे यंदा आंबा कॅनिंग आठ दिवस उशिराने सुरवात झाली; मात्र सुरवातीला तुलनेत कमी माल उपलब्ध होत आहे. किलोला बावीस ते साडेतेवीस रुपये दर मिळत आहे. प्रक्रियेसाठी आंबा विकत घेण्यास सुरवात झाली असली तरीही परराज्यातून येणार्या प्रशिक्षीत कामगारांचा प्रश्न मोठ्या प्रक्रियादारांना अजूनही सतावत आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम कोकणातील शेतमाल ठप्प होईल अशी भिती होती; मात्र त्यावर मार्ग काढण्यात यश आले. कँनिगचा प्रश्नही रत्नागिरीत झालेल्या बैठकीत सोडवण्यात आला. रत्नागिरीतील एक्झॉटिका कंपनीने 30 एप्रिलपासून आंबा खरेदीला सुरवात केली. त्यात बागायतदारांना प्राधान्य दिले असून प्रतिदिन 10 ते 12 टन आंबा खरेदी होत आहे. प्रक्रियेसाठी अपेक्षित माल मिळत नसल्याने प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु करण्यास आठ दिवस लागले. दिवसाला किमान 60 ते 70 टन आंबा कंपनीला अपेक्षित आहे. शेतकर्यांकडून तेवढा माल आला नाही, तर तालुकास्तरावर नियुक्त केलेल्या पुरवठारांच्या साखळीतून खरेदीला सुरवात केली जाणार आहे. त्यानंतर परजिल्हा किंवा परराज्यातून आंबा खरेदी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कंपनी नियोजन करत आहे.
यंदा आंबा हंगाम एक महिना उशिराने सुरु झाला असून उत्पादनही कमी आहे. बाजारात आंबा पाठविण्यासाठी माल कमी पडत आहे. पहिल्या पंधरवड्यानंतर आंबा मोठ्याप्रमाणात उपलब्ध होईल अशी आशा जिल्ह्यातील मोठ्या प्रक्रियादारांकडून व्यक्त केली जात आहे. तुलनेत यंदा एक आठवडा उशिराने कॅनिंगला सुरवात झाली आहे. कोरोनामुळे प्रतिवर्षापेक्षा दरही एक ते दोन रुपयांनी कमी मिळत आहे. सध्या मोठे प्रक्रियादार एका शिप्टमध्ये काम करत आहेत. त्यासाठी स्थानिक कामगारांची मदत होत आहे. तिन्ही शिप सुरु करण्यासाठी परराज्यातील कामगारांचा उपयोग होतो. कोरोनामुळे ते कामगार उपलब्ध होणे अशक्य आहे. प्रक्रियायुक्त पदार्थाना सध्या मागणी नसली तरीही चार महिन्यांनी मार्केटमध्ये उभारी येऊ शकेल.
निर्यात ठप्पच
गतवर्षीचा सुमारे 35 ते 40 टक्के माल मंदीमुळे शिल्लक आहे. यंदा उत्पादन सुरु केले तरी बाजारपेठ शोधण्याचे आव्हान असून तोही पडून राहणार आहे. सुमारे 60 टक्के माल युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशात निर्यात होतो. तेथे कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. स्थानिक मार्केटवर अवलंबून राहून उत्पादन करावे लागणार आहे.