रत्नागिरी :- लॉकडाऊनमुळे आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला असतानाच वाशी मार्केट येथून सुरु असलेल्या निर्यातीमुळे आंब्याची परदेशात विक्री झाली. एप्रिलमध्ये ४,१२० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून निर्यातीमध्ये प्रामुख्याने हापूस आंब्याचा समावेश होता. बहरीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये निर्यात झाली.
गतवर्षी एप्रिलमध्ये ८ हजार ८३५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के निर्यात असली तरी कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे जलवाहतुकीने झालेली निर्यात निश्चितच समाधानकारक आहे. यावर्षी अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरीया, न्यूझीलंड तसेच युरोपीय देशातील हवाई वाहतूक सेवा बंद असल्याने निर्यात तेथे झाली नाही. एकूणच यावर्षी आंबा हंगाम उशीरा सुरु झाला. त्यातच उत्पादनही अत्यल्प असताना झालेली निर्यातीमुळे शेतकºयांचा फायदा झाला आहे.
गतवर्षी ९,९९४.३ मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता. यावर्षी ४,१२० मेट्रिक टन आंबा निर्यात झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. बाजारपेठेमध्ये ग्राहक उपलब्ध नसल्याने विक्रीसाठी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र असे असतानाही आखाती प्रदेशात मात्र समुद्रमार्गे निर्यात सुरु राहिल्याने आंब्याला परदेशातील बाजारपेठ उपलब्ध झाली. आंब्याबरोबरच अन्य फळे व भाजीपाल्याचीही निर्यात करण्यात आली. मध्य व पूर्व देशातून फळे व भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. यामुळे कोवीडचे संकट असतानाही निर्यातीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. कांदा, द्राक्ष, केळी, लिंबू, नारळ, चिंच, आले, बटाटा, लसूण व भाज्यांची निर्यात झाली आहे. गतवर्षी फळे व भाज्यांची एकूण निर्यात १४,५१७ मेट्रिक टन असताना यावर्षी ९,४८०.१२ मेट्रिक टन निर्यात झाली आहे. यामुळे शेतकºयांच्या शेतमालाचा बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. राज्याचे प्रधानसचिव अनुपकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल निर्यात शेतनियंत्रण कक्षाने निर्याती संदर्भातील येणाºया विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच केलेल्या कामकाजामुळे निर्यात सुकर झाली आहे.