रत्नागिरी : राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर चर्चा केली. परीक्षा समितीने तयार केलेला अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा दि.१ जुलै ते १५ जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा उएळ दि.२० ते ३० जुलै अखेर घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल दि.१५ आॅगस्ट पर्यत जाहीर करून दि. १ सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का, लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश दिला जावा व शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी. एम.फिल व पी.एचडीचा मौखिकी विडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयास त्यांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र राज्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती विचारात घेता नंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सूचित केले.
प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अथवा मोठ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दोन समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. समुपदेशन केंद्राव्दारे पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावी नंतर आणि पदव्युत्तर साठी घेण्यात येणार्या सीईटी परीक्षेचे नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात येवून समितीने आपले वेळापत्रक तयार करण्याची सूचना सामंत यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षणराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्याच्या प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी जिल्हास्तरावरील सीईटी केंद्र्राची संख्या वाढवून प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र तयार करण्याची सूचना केली. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आकस्मित निधीतील काही रक्कम आणि कर्मचार्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी आभार व्यक्त केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिगसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.