पंचवीस वर्षांपूर्वीच्या रागातून तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- सुमारे २५ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरुन तरुणाला शिवीगाळ करत लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना मंगळवार ५ मे रोजी दुपारी १. १५ वा. सुमारास जांभारी येथे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश विठू पावरी (रा. जांभारी पावरी वठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सदानंद विश्वनाथ कटनाक (३८, रा. जांभारी पावरी वठार, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी सदानंदचे वडील विश्वनाथ कटनाक दारुच्या नशेत सुरेश पावरी याच्या अंगणात झोपले होते. तेव्हा सुरेशने विश्वनाथ हा आपल्या पत्नीकडे आल्याच्या संशयातून सुरीने विश्वनाथ यांच्यावर वार केला होता. जखमी झालेल्या विश्वनाथ यांनी याबाबत  पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी सुरेशला अटक केली होती. तेव्हा पासून सुरेश पावरीच्या मनात राग होता.

यातूनच तो वेळोवेळी विश्वनाथ यांचा मुलगा सदानंदला शिवीगाळ करुन धमकी देत होता. मंगळवारी सदानंद आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- ०८ एएल- १९६६ ) वरुन औषध आणण्यासाठी खंडाळा येथे गेला होता. औषध न मिळाल्याने तो घरी परतत असताना जांभारी येथील भैरी देवाच्या सहाणेजवळ आला. त्यावेळी सुरेश पावरी तेथून लाकडे घेऊन जात असताना त्याला सदानंद दिसला. त्यावेळी पूर्वीच्या रागातून सुरेशने लाकडाच्या भाऱ्यातील एक लाकूड काढून डोक्यावर मारत त्याला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.