खरिपासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते मिळणार बांधावर

रत्नागिरी :- कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड आणि बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
फळझाडे लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अत्यल्प अल्पभूधारकांना येत्या हंगामामध्ये आंबा, काजु, नारळ, कोकम, फणस यासारख्या फळझाडांची लागवड करता येईल. त्यासाठी आवश्यक अर्ज, आधारकार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रासह लागवडीचे प्रस्ताव, मंजुरीनंतर लागवड पूर्व कामे तात्काळ सुरू करता येतील. जून महिन्यात वेळेवर लागवडीसाठी शासकीय, विद्यापीठ व परवानाधारक खाजगी रोपवाटीकवर पुरेशा प्रमाणात कलमे व रोपे उपलब्ध करण्यात येत आहेत. इच्छुक शेतकर्‍यांनी जवळच्या कृषी सहाय्यकाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आवश्यक असणारी खते, बियाणे बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकरी व वितरक यामध्ये समन्वय साधण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बियाणे व खते यांची मागणी शेतकर्‍यांनी स्वतः अथवा गटामार्फत जवळच्या कृषि सहाय्यकाकडे तात्काळ नोंदवावी म्हणजे मूदतीत खते व बियाणे उपलब्ध होतील असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी यांनी सांगितले.