कामगाराच्या मृत्यू प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण :- खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री. एम. पेपर मिल या कंपनीच्या मेंटेनेसचे काम करीत असताना सिमेंटच्या पत्र्यावरून पडून एका कामगाराचा काही दिवसांपूर्वी पडून मृत्यू झाला. याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकासह गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबर वर्क्सचेचे मालक व मेंटेनन्सचे मॅनेजर या तिघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी दिली आहे.

यानुसार गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबर वर्कसचे मालक ओमप्रकाश गोरख गुप्ता (रा. गुजरात), मेंटेनेस इंजिनियर पपाई कनाई सिंगा ( पश्चिम बंगाल), थ्री. एम. पेपर कंपनीचे व्यवस्थापक हसमुख मोरारजी संगोई (रा. चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. जितेंद्र दीनानाथ प्रसाद असे मृत कामगाराचे नाव आहे. हा कामगार १९ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास हा अन्य कामगारांसमवेत थ्री. एम. पेपर मिल या कंपनीचे मेंटेनन्स चे काम करण्याकरता सिमेंटच्या पत्र्याच्या शेड वरून चालत जात असताना पायाखाली सिमेंटचा पत्रा फुटल्याने तो 35 फूट खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमध्ये या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे गुप्ता फॅब्रिकेटर्स अँड फायबरचे मालक ओमप्रकाश गुप्ता यांनी आवश्यक ती साधने न पुरविल्याने तर मेंटेनन्स इंजिनीयर पपई सिंगा व थ्री. एम. पेपर मिल या कंपनीचे व्यवस्थापक हसमुख संगोई या दोघांनी या कामगाराला दहा मीटर उंच व साधारण 175 मीटर लांब सिमेंटच्या पत्र्याच्या शेडवर काम करताना सेफ्टी बेल्ट करण्याकरता आवश्यक ती व्यवस्था न पुरवता तसेच काम करण्याकरता शेडवर चढण्याकरता शिडी अगर इतर व्यवस्था न करता त्याला कंपनीच्या मेन बिल्डिंगच्या टेरेसवर चढून पुढे कंपनीच्या शेडवर काम करण्यासाठी साधारणतः 100 मीटर अंतर शेडवर जाण्यास सांगितले. त्यावेळी चालत असताना या कामगाराच्या पायाखालील सिमेंटचा पत्रा फुटल्याने सदरचा अपघात घडलेला आहे. तरी या प्रकरणी या तिघांविरोधात कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत यापूर्वी देखील या कंपनीमध्ये अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासनाने योग्य न लक्ष दिल्याने या कंपनीमध्ये अपघाताच्या घटना घडत आहेत.