पुण्यातील रेड झोनमधून बेकायदेशीरपणे जिल्ह्यात प्रवेश; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:– जिल्हा बंदीच्या काळात वाहतुकीची कोणतीही परवानगी नसताना विनापरवाना वाहतूक करुन पुणेसारख्या रेडझोनमधून देवरुख-निवे येथे येऊन कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याचा संभव आहे हे माहीत असून देखील बेकायदेशीररित्या प्रवेश करुन घातकीपणाची कृती केल्याप्रकरणी दोघांविरोधात अलोरे शिरगांव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३, ४ व साथ रोग प्रतिबंध अधिनियम लागू केलेला असताना जिल्ह्यात खासगी वाहतूकीला बंदी घातलेली आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा सील केलेल्या असताना पुणेसारख्या रेडझोनमधून दोन तरुण निवेबुद्रुक येथे आले होते. त्यामध्ये मयुर शशिकांत हिरवे (३०) रा. निवे-बुद्रुक व मंदार वासुदेव जोशी (१८) रा. निवे-बुद्रुक व सध्या रा. हवेली-पुणे, हे दोन तरुण अवैध प्रवासी वाहतूक करीत देवरुख-निवे येथे यायला निघाले होते.या दोघांनाही कुंभार्ली घाटातील चेकपोस्टवर अडविले होते. त्यावेळी पुणेसारख्या रेडझोनमधून हे दोन तरुण पुढे आल्यानंतर या दोघांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, कोणताही ई पास नसताना अवैध प्रवासी वाहतुकीद्वारे बेकायदेशीर प्रवेश करुन घातकीपणाची कृती केली म्हणून या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अलोरे पोलीस करीत आहेत.