रत्नागिरी :- परिषदेच्या अंतर्गत खातेनिहाय बदलांसह रखडलेली वैद्यकीय बिले, आरोग्य विभागातील चालकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव यावर होत असलेल्या दिरंगाईबाबत उच्च व तंत्रशक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली.
जिल्हा परिषदेतील विविध प्रश्नांसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्यासह आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, शिक्षण सभापती सुनिल मोरे, संतोष थेराडे, बाळशेठ जाधव, अण्णा कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचार्यांची सुमारे दोनशे वैद्यकीय बिले प्रलंबित होती. ती मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतानाही प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. याचा जाब श्री. सामंत यांनी विचारला. यामध्ये जे कोणी वेळाकाढूपणा करत असतील त्यांनी अशी कामे बंद करावीत अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी कडक सुचना त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील खात्यांतर्गत टेबल बदलाचे घेतलेले निर्णय गैरसोयीचे ठरले आहेत. विनंती बदलीमध्ये मागणी केलेल्या खात्यापेक्षा दुसर्याच खात्यात नेमणूक देण्यात आल्याचा प्रकार पुढे आला होता. यावरही सविस्तर चर्चा झाली. संबंधित कर्मचार्यांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाकडून घेतला जावा अशी सुचना त्यांनी दिली. आरोग्य विभागातील कंत्राटी चालकांना देण्यात येणार्या पगाराबाबतच्या प्रश्नावर चर्चा झाली. 68 चालकांना मिळणारे मानधन अत्यंत कमी होती. तांत्रिक निकषात हा प्रश्न अडकून पडलेला होता. त्या कर्मचार्यांना 17 हजार रुपये पगार द्यावा अशी सूचना प्रशासनाला दिली आहे.