नागरिकांकडून निर्बंध धाब्यावर; खरेदीसाठी गर्दी रस्त्यावर

रत्नागिरी :- जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनचे निर्बंध अधिक कडक केले जातील असे स्पष्ट केले. मात्र काल दिवसभरात उलट चित्र होते. नागरिकांनी सर्व निर्बंध धाब्यावर बसविल्याचे दिसत होते. बाजारपेठेत दुकाने उघडण्यात आली, दुचाकी, चारचाकी वाहनांनी प्रचंड वर्दळ होती, खरेदीसाठी नागरिकाची गर्दी दिसत होती, प्रशासनाने ऑरेंज झोन म्हणून नागरिकांना जणू प्रचंड सुट दिल्याप्रमाणे वावर सुरू होता. त्यामुळे प्रशासनाचे धोरण संभ्रमात टाकणारे दिसत आहे.  
जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निर्णयानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सुट दिली आहे. त्याची अंमलबजावणी परवापासून करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र कशाला सुट दिली आणि कशावर बंधने आहेत, याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु दुकाने, रिक्षा, चारचाकी, दुचाकी आदीला परवानगी असल्या प्रमाणे नागरिक बाहेर पडले. दुकान उघडण्यात आली. रिक्षा, चारचाकी वाहने रस्त्यावर दिसू लागील. गर्दी आणि वर्दळ दिसल्याने पोलिस आणि पालिका प्रशासनाने कारवाई करीत दुकाने बंद केली. रिक्षांवर कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणार्‍या दुचाकीधारकांवर कारवाई केली. हा संभ्रम पाहुन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे आदींनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मद्य विक्री दुकानांना परवानगी देण्यावरून पुन्हा संभ्रम निर्माण झाला. दुकानं बंद असताना तळीरामांनी गर्दी केली. त्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. रिक्षा सुरू ठेवण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. जिल्हा अंतर्गत दुचाकी, चार चाकी वाहनांना परवनगी देण्यात आली. सायंकाळी सात ते सकाळी सात या काळात घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. अदीचा माहिती दिली. नागरिक सवलतीचा गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्यामुळे शासनाने पुन्हा लॉकडाउनचे निर्बंध पुर्वी प्रमाणे कडक केल्याचे उदय सामंत आणि जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 
मात्र आज शहर आणि परिसरात उलट चित्र होते. सर्व निर्बध धाब्यावर ठेऊन नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसत होते. दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहांची शहरात प्रचंड वर्दळ दिसत होती. नागरिकांचीही खरेदीसाठी गर्दी होती. सोशल डिस्टन्सचे खरेदीवेळी तीन तेरा वाजल्याचे दिसत होते. जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केल्याचे सांगून दिलेल्या सवलतीमुळे शहरात गर्दी आणि नेहमी प्रमाणे वर्दळ दिसत होती. हे सर्व चित्र संभ्रम निर्माण करणारे आणि कोरोनाच्या संसर्ग वाढविणारी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नेमती भुमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.