जिल्ह्यातील चार गावे कोरोना बाधित क्षेत्र

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आता चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली, संगमेश्वर तालुक्यातील पूर आणि बामणोली मंडणगड तालुक्यातील तळेघर ही गावे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.याबाबतची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना आता ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत ते परिसर- गावे कोरोना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.या बाधित क्षेत्रात बाहेरील व्यक्तीला येण्यास व या बाधित क्षेत्रातून बाहेर जाण्यास प्रतिबंध केले आहे.

जिल्ह्यात तपासणीसाठी 1690 नमुने घेतले होते त्यापैकी १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 1292 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुमारे 382 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हयात बाहेरील क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातच विलगीकरण करुन ठेवण्यात येत असून अशा विलगीकरणात अर्थात होम क्वारंटाईनचा ज्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूण झाला त्यांना यातून मुक्त देखील करण्यात येत आहे. आज अखेर जिल्हयात होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 2795 इतकी आहे.
लॉकडाऊन कालावधी जाहीर झाल्यानंतर प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना अंतर्गत जनधन खाते असणाऱ्या महिलांना केंद्रातर्फे आर्थिक रक्कम खात्यात जमा करुन देण्यात आली. सोबतच किसान सन्मान निधीच्या रकमा देखील बँकामध्ये जमा झाल्या आहेत. या लाभार्थ्यांना बँकेत जाऊन रक्कम काढण्याऐवजी त्यांना पोस्ट खात्यातर्फे नजिकच्या पोस्ट कार्यालयातून आधारकार्ड आधारित प्रणालीद्वारे रक्कम दिली जात आहे. या प्रकारे असलेल्या सवलतीचा लाभ जिल्हयातील 5015 नागरिकांनी जिल्हयातील 77 टपाल कार्यालयातून आतापर्यंत 1 कोटी 28 लाख रुपये इतकी रक्कम वितरीत झाली आहे.
लॉकडाऊन कालावधीत आपापल्या गावाला जाण्याची इच्छा असणाऱ्या तसेच रत्नागिरी जिल्ह्यात येण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे अर्ज प्रशासनास प्राप्त होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जायचे आहे अशी विनंती करणारे 22,482 अर्जआतापर्यत प्राप्त झाले आहेत. तर बाहेरील ठिकाणांवरुन जिल्ह्यात येण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जांची आज अखेर संख्या 26, 345 इतकी झाली आहे.
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 107 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.