रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी एकूण 35 हजार ऑनलाईन अर्ज नागरिकांनी केले आहेत. यातील जवळपास सतराशे जणांचे ऑनलाईन पास तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
ग्रीन व ऑरेंज झोनमधील नागरिकांना जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी तब्बल 15 हजार अर्ज आले आहेत. यामध्ये राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्याबरोबरच कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल राज्यात जाण्यासाठीचेही अर्ज आले आहेत. त्याचप्रमाणे परजिल्ह्यातून किंवा राज्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठीही वीस हजार अर्ज आले आहेत. यामध्ये फक्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 29 व्यक्तींची यादी देण्यात आली आहे. या व्यक्तींच्या सर्व तपासण्या व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना जिल्ह्यात घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. सध्या सतराशे जणांचे ऑनलाईन पास तयार करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकार्यांनी दिली.