फिटनेस सर्टिफिकेटसाठी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी

रत्नागिरी :- परजिल्ह्यात आणि परराज्यात जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर जाण्याआधी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करणे आणि आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत, याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळपासून एकच गर्दी झाली. पहिल्याच दिवशी साडेचारशे सर्टिफिकेट देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याच वेळी अन्य प्रांतातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 36 हजार जणांनी बाहेर जाण्यासाठी अर्ज केले आहेत. हे सर्वजण आता आपापल्या गावी जाण्यासाठी तयारी करू लागले आहेत. अन्य राज्यातील लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये थर्मल स्किनिंग, पल्स रेट, खोकला, डोकेदुखी या विषयी तपासणी करून अन्य काही लक्षणांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या साडेचारशे जणांमध्ये एकही संशयास्पद रूग्ण आढळून आला नसल्याचेही यावेळी डॉ. बोल्डे यांनी सांगितले.