जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू: ना. उदय सामंत

रत्नागिरी :- जिल्ह्यात आजपासून लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. मात्र याचा नागरिकांनी गैरफायदा घेऊन शहरातून व ग्रामीण भागात प्रचंड गर्दी केली. लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. कशाला सुट दिली आणि कशावर बंद आहे, हे समजून न घेता दुकाने, वाईन मार्ट, रिक्षा सुरू झाल्या. स्पष्ट सूचना काढण्यापूर्वीच शासनाच्या ही गंभीर बाब लक्षात आल्याने आज सुधारीत आदेश काढून पुर्वी प्रमाणे कडक निर्बंध लागू केले आहेत. म्हणजे आता फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 
येथील अल्पबचत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुलाल बगाटे, नगराध्यक्ष बंड्या सावळी आदी उपस्थित होते. 
ते म्हणाले, लॉकडाउनमधून आज काही मुभा देण्याबाबत प्रशासनाने हालचाल सुरू केली. मात्र नियमावलीबाबत संभ्रम आहे. सर्वांनी घराबाहेर पडा असे नाही, सर्वांनी घरातच राहा. बाहेर पडुन गर्दी केली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. दुकानांबाबत कोणताही भेदभाव न ठेवता जी दुकाने गर्दीत थाटलेली नसून एकाबाजूला आहेत, अशीच सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र आज बाजारपेठेत अनेकांनी दुकाने उघडली आणि गर्दी वाढली. त्यामुळे ती बंद करावी लागली. वाईन शॉप सुरू ठेवण्याबाबतही तोच निर्णय आहे. एकाबाजूला असलेल्या दुकानांना परवानगी आहे. मात्र हे सर्व पहिल्यांदाच घडल्याने याबाबत आम्ही शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. दोन दिवसात त्याबाबत निर्णय होईल. रिक्षा बंदच राहाणार आहेत. टॅक्सीला परवनगी असली तरी आपल्याकडे टॅक्सी नाही. त्यामुळे रिक्षाबाबतही आम्ही मार्गदर्शन मागविले 
आहे. 
जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर टाळेबंदीतून मुभा काढण्याचे नियोजन करीत असताना मुभा दिल्याने गर्दी वाढत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सायंकाळी शासनाने नवे परिपत्रक काढले असून पुर्वीप्रमाणे लॉकडाउनच्या काळातील कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या मुभा आणि सवलती देण्यात येणार होत्या, त्या तुर्तास तरी बंधने आल्याचे, श्री. सामंत यांनी सांगितले.