जिल्ह्यात आज आणखी चौघांना कोरोनाची लागण; जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे

रत्नागिरी:- जिल्ह्यात आज दापोली तालुक्यातील शिरधे आणि वणौशी येथील दोघांना व संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील दोघांना अशा एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहे. चौघेही मुंबईहून आल्याने संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. मध्यंतरी एक आठवडा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. सलग रुग्ण सापडल्याने जिल्हा पुन्हा कोरोनाच्या दहशतीखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.