रत्नागिरी :- जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांपेक्षा जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात येण्यासाठी 24 हजार 650 तर बाहेर जाण्यासाठी 18 हजार 550 अर्जदारांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात तपासणीसाठी आतापर्यंत 1 हजार 366 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 11 पॉझिटिव्ह तर 1 हजार 132 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 2 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. 221 अहवाल प्रलंबित असून मागील 24 तासात 171 अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्यात असणाऱ्या होम क्वारंटाईनची संख्या 4 हजार 166 इतकी आहे. यात जिल्हाबाहेरील क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केलेले आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी जिल्हयात सुरु असून या कालावधीत सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत केवळ अत्यावश्यक कामासाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. त्यासाठी दुचाकीवर एकच व्यक्ती व 4 चाकीमध्ये वाहनचालक आणि 2 व्यक्ती केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडू शकतात. या सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक आहे. कशेडी येथे वाहतुकीद्वारे तसे पायी येणारे नागरिकांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देऊन हा तपासणी नाका अधिक मजबूत करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 व ग्रामपंचायत सभांबाबत नियम 1959 च्या तरतुदीनुसार दरमहा सभा घेणे बंधनकारक आहे. याचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. कोव्हीड- 19 च्या पार्श्वभूमीवर लागू कलम 144 च्या अनुषंगाने 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई आहे. याबाबत जि.प. मुख्याधिकारी यांच्या विंनतीवरुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अटींच्या अधिन राहून सीपीसी 1973 चे कलम 144 मधून ग्रामपंचायत सभांना सूट दिली आहे.