जिल्ह्यातील विंधन विहिरींसह नळपाणी योजना दुरुस्ती कामे लागणार मार्गी


जि. प. अध्यक्ष रोहन बनेंच्या प्रयत्नांना यश 

रत्नागिरी:- कोरोनामुळे रखडलेली जिल्ह्यातील विंधनविहिरींसह नळपाणी योजना दुरुस्ती कामे मार्गी लावण्यात जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांना यश आले आहे. विंधनविहिरीसाठी संमतीपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्यामुळे 322 प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. तर पाणी योजना दुरुस्तीच्या 90 प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध कामांबाबत अध्यक्ष बने यांनी आढावा घेतला. त्यात पाणीटंचाई यासह अतिवृष्टीमधील कामांचा समावेश आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये टंचाई आराखड्यातील विविध कामे रखडलेली होती. ती सुरु करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यातील तांत्रिक त्रुटींवर उपाययोजना करण्यासाठी बने यांनी पुढाकार घेतला होता. टंचाई आराखड्या विंधनविहिरी उभारण्यासाठी 322 प्रस्ताव मंजूर होते; परंतु तहसिलदार कार्यालयात ये-जा करणे अशक्य असल्यामुळे संमतीपत्र मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत बने यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा केली. संमतीपत्राऐवजी कामे सुरु करण्यापुर्वी हमी पत्र घेतली जावीत. कोरोनामुळे निर्माण झालेली बंधने उठल्यानंतर संमतीपत्र सादर करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे विंधनविहीरीची कामे मार्गी लागणार आहेत. 
जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यात नळपाणी योजना दुरुस्तीची 270 कामे घेण्यात आली आहेत. त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे; परंतु ती कामे लॉकडाऊनमध्ये अडकलेली होती. त्यातील 92 दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्या कामांच्या निविदेचे प्रस्ताव सात दिवसांच्या कमी कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ती कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. अजून पन्नास प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ही कामे लवकरच मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.