रत्नागिरी :- कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका टंचाई काळात खोदण्यात येणार्या विंधनविहिरींच्या कामांवर झालेला आहे. त्यासाठी आवश्यक संमतीपत्रच करणे अशक्य असल्यामुळे यंदा आराखड्यात घेण्यात आलेल्या 322 विंधनविहिरींचा कार्यक्रम रखडणार आहे. टँकरसह ग्रामीण भागातीला लोकांना विंधनविहीरींच्या पर्यायापासून मुकावे लागणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असलेला रत्नागिरी जिल्हा टंचाई मुक्त करणे शासनाला अशक्य आहे. त्यासाठी शक्य तिथे टँकर, विंधनविहीरी उभारण्याची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आराखडाही तयार केला जातो. त्यामध्ये नळपाणी योजनाही दुरुस्त करुन घेण्यात येतात. गळतीमुळे अनेकवेळा योजनांचे पाणी वाया जाते. तो पुरवठा सुरळीत करण्यासाठी याचा उपयोग केला. त्याप्रमाणे 2020 ते 21 आर्थिक वर्षासाठी 322 विंधनविहिरींना टंचाई आराखड्यात मंजूरी मिळालेली होती. एप्रिल, मे महिन्यात खोदाईचे काम केले जाते. एका विहिरीला 70 हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. त्याप्रमाणे सव्वा दोन कोटी रुपयांची तरतूदही केली गेली आहे. ही विहीर खोदण्यापुर्वी जमीन मालकाचे संमतीपत्र आवश्यक असते. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला असून सर्वच शासकीय यंत्रणा त्यामध्ये व्यस्त आहे. संमतीपत्रासाठी तहसील कार्यालयात गावातील लोकांना जाणेही शक्य होत नाही. ग्रामपंचायतींकडून ही कार्यवाही केली जाते. कोरोनामुळे अनेक व्यवहार, विकासकामे ठप्प झाली होती. त्याप्रमाणे विंधनविहिरींच्याही कामांचा समावेश झालेला आहे. यातून मार्ग काढणे सध्यातरी अशक्य असल्यामुळे टंचाईग्रस्त भागात विंधनविहिरींचा पर्याय ठेवण्यात आला होता. त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. परिणामी टँकरची संख्या वाढणार आहे.