वाईन तेथे लाईन… पण पदरी निराशाच

रत्नागिरी :- रत्नागिरीत सोमवार पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्याचा निर्णय व्हायरल झाला. वाईन शॉप सुरू होणार म्हणून अनेकांच्या चेहऱ्यावर हासू फुलले.. तयारी सुरू केली.. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ब..चजणांनी रांगा लावल्या.. पण अनेकांचा हिरमोड झाला. उत्पादन शुल्क विभागाने परवानगी न दिल्याने वाईन शॉपचे दरवाजे उघडलेच नाहीत आणि तळीरामांच्या पदरी निराशा पडली.

सोमवार पासून वाईन शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे हा मेसेज रविवारी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहचला होता. दीड महिना वाट पाहिलेल्या तळीरामच्या संयमाचा बांध या मेसेजमुळे फुटला. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामानी दारू दुकानांबाहेर हजेरी लावली. आठ, नऊ, दहा वाजता तरी दुकान उघडेल म्हणून अनेकांनी वाट पाहिली. 12 वाजले तरी कडक उन्हात अनेकांनी संयम बाळगला. उघडणार उघडणार असा एकमेकांना सल्ला ही दिला पण वाईन शॉप काही उघडले नाहीत. कोल्हापूर आयुक्तांनी आदेश न दिल्याने रत्नागिरीत वाईन शॉप काही उघडले नाहीत. वाईन शॉप मालकांनी देखील उत्पादन शुल्क च्या कार्यालयात ठाण मांडला पण उपयोग काही झाला नाही. दुपारी अखेर वाईन शॉप बाहेरची गर्दी आपोआप कमी झाली.