रेड झोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही, नागरिकांनी स्वतःहून बंधन पाळा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी :- नागरिकांनी शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा घेऊ नये. त्याचा अतिरेक झाल्यास पुन्हा बंधने येतील किंवा रेड झोनमध्ये जाण्यास वेळ लागणार आहे. स्वयं शिस्त पाळा, मास्क वापरा, सोशल डिस्टंस ठेवा, स्वतःला निर्बंध घालून घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले. 

जिल्हाधिकार्‍यांनी जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी सोमवारी फेसबुक लाइव्ह कार्यक्रम घेतला. याला दहा हजार पाचशेपेक्षा अधिक व्ह्यिवर्स होते तर 242 जणांनी लिंक शेअर केली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे उपस्थित होते. पालिका किंवा शहरी भागात बाहेरून येणार्‍यांची माहिती देण्यासाठी शहरी भागात नागरीकृती दल तर ग्रामीण भागात ग्रामकृतीदल तयार आहेत. ते या भागातील माहिती प्रशासनाला देतात. रत्नागिरीत आल्यानंतर खासगी डॉक्टर, मेडिकल ऑफिसर्स, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय आदींकडून तपासून प्रमाणपत्र घेऊ शकता. रेड झोनमधून आलेल्यांची चाचणी केली जाते. घाबरु नका, त्यांना क्वारंटाईन केले जाते. संक्रमन होणार नाही, संपर्कात येणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेतो.

खासगी नोकरदारांनी 33 टक्के कामगारांचा नियम पाळून नोकरीवर हजर व्हायचं आहे. जिल्हा अंतर्गत कंपन्या असतील तर त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नाही. धार्मिक स्थळे मंदिर, मशिद, चर्च बंदच राहणार आहेत. लग्नासाठी मुभा दिली आहे. 50 लोकांच्या उपस्थित योग्य तो सोशल डिस्टन्स, मास्क घालून करू शकता. एखाद्याचा मृत्यू झाला तर महत्त्वाच्या व्यक्ती खेरीज अन्य कोणाला त्याच्या विधीसाठी उपस्थित राहण्यास परवानगी नव्हती. मात्र आता अंत्यविधीसाठी 20 लोक गोळा होऊ शकता, मात्र नियमं पाळून असेही जिल्हाधिकार्‍यांनी शेवटी नमूद केले.