रत्नागिरी:- मुंबईत चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. रुग्णांची फसवी संख्या सांगितली जाते आहे. तपासण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. भाजपने ही मागणी केली की आमच्यावर राजकारण केल्याचा आरोप केला जातो. मुंबईतील चाकरमान्यांची तपासणी करून त्यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाठवावे अशी चर्चा दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत सुरू असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टाळेबंदीमुळे मुंबईतील एका घरात 15 ते 20 जणांना रहावे लागत आहे. 45 लोकांमागे एक शौचालय असा नियम असताना धारावीत मात्र 300 लोकांमध्ये एक शौचालय आहे. महापालिका व राज्य शासनात कोणताही समन्वय नाही, असे चित्र आहे. इव्हेंट मॅनेजमेंट करणार्यांकडून मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे आवश्यक आहे असे आ. लाड यांनी सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आपल्या निधीतील 50 लाखांचा निधी द्यावा आणि जिल्हा नियोजनमधून 2 कोटी रुपये दिल्यास कोरोनावर मात करण्यासाठी 500 खाटांचे दर्जेदार रुग्णालय उभारता येईल, अशी सूचना आमदार लाड यांनी केली.
सोशल मीडियातून राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाईट टिका केली जात आहे. तसेच फडणवीस यांना मारण्याची धमकीही दिली जात आहे. याविरोधात राज्य शासनाने कोणताही कारवाई केलेली नाही. यापूर्वी ठाकरेंना अशा धमक्या येत होत्या तेव्हा भाजप सरकारने गांभिर्याने दखल घेऊन कारवाई केली होती. याविरोधात प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे भाजपच्या वतीने तक्रार देण्यात येत असल्याचे लाड यांनी सांगितले.