बाजारपेठा राहणार बंद; मद्य विक्री दुकाने उघडणार

रत्नागिरी :- महाराष्ट्र शासन आदेशानुसार ऑरेंज झोन मध्ये शिथिलता देण्यात आल्या आहेत त्याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा  लागू  केलेला आहे. राज्य शासनाने शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक आस्थापना व खाजगी व्यवसाय, काही अटी व शर्तीवर सुरू ठेवणेबाबत प्राप्त झालेल्या आदेशानुसार 4 मे पासून पुढे 2 आठवडयांसाठी वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत  आहे.  या नुसार मद्य विक्री दुकाने पूर्वपरवानगीने सुरु ठेवता येतील. मात्र मद्य विक्री करताना एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानाजवळ उपस्थित राहणार नाहीत व प्रत्येक व्यक्तींमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील, याची दक्षता घेणे आवश्यक राहील. 

कोणत्याही आवश्यक नसलेल्या बाबींसाठी कोणत्याही व्यक्तीची किंवा वाहनाची हालचाल सायंकाळी 7. 00 ते सकाळी 7. 00 या कालावधीत करता येणार नाही. वय वर्षे 65 वरील जेष्ठ नागरिक, अन्य आजाराने ग्रस्त व्यक्ती ( मधुमेह, उच्चरक्तदाब, आस्थमा, हृदयविकार व अन्य कोणतेही इतर ) गरोदर महिला व वय वर्ष 10 खालील लहान मुले यांना अत्यावश्यक सेवा आणि वैदयकिय सेवा याशिवाय घराच्या बाहेर पडता येणार नाही. त्यांना घरीच राहणे आवश्यक राहील .त्यात  परवानगी दिलेल्या चारचाकी वाहनामध्ये एक वाहन चालक व दोन व्यक्ती यांना प्रवासाची मुभा राहील. दोन चाकी वाहनावर केवळ चालकास प्रवासाची मुभा राहील. नगरपालिका हद्दीतील अतिआवश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि बाजारपेठा बंद राहतील. पालिका हद्दीमध्ये सर्व प्रकारची दुकाने अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली असा भेदभाव न करता जी गर्दीत थाटलेली नसून केवळ एकटेपणाने आस्तित्वात आहेत ती सुरू ठेवण्यात येतील. ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने ( मॉल वगळून ) उघडी राहतील,  सर्व शासकीय व खाजगी कार्यालय त्यांचे 33 टक्के कर्मचारी संख्येच्या मर्यादेत उपस्थितीने सुरू ठेवता येतील. प्रवासी वाहतूकीची वाहने एक वाहन चालक व दोन प्रवासी अशा पध्दतीने सुरू ठेवता येतील. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, जिल्हादंडाधिकारी यांचे परवानगीशिवाय होणार नाही. परवानगी मिळाल्यास चारचाकी वाहनांद्वारे अनुज्ञेय बार्बीसाठी एक वाहन चालक व दोन प्रवासी अशी वाहतूक करता येईल. लग्न समारंभात जास्तीत- जास्त 50 लोकांच्या उपस्थितीस अधिन राहन परवानगी राहील. मात्र सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 लोकांपर्यंत उपस्थिती अनुज्ञेय राहील. पानटपरी व तंबाखूची दुकाने 100 बंद राहतील तसेच अन्य दुकानांतून पान,  तंबाखू विक्री करता येणार नाही असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले आहे.