दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन

दापोली :- तालुक्यातील पाळंदे येथे मृत डॉल्फिन आढळल्याने दापोलीत यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकाच समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात दोन डॉल्फिन माशांचा मृत्यू झाल्याने निसर्गप्रेमीमधून चिंता व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्र किनारी गेल्या आठवड्यात एका डॉल्फिनचा मृत्यू झाला होता ही बाब ग्रामस्थांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फिनला समुद्रकिनारी खड्डा करून पुरून टाकले. ही घटना ताजी असताना रविवारी दुसऱ्या एका  डॉल्फिनचा मृतदेह समुद्रातून वाहून येऊन किनार्‍याला पडलेला आढळून आला. 
एकाच आठवड्यात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यू झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मुरुड, पाळंदे, हर्णे समुद्र किनारी डॉल्फिन पाहाण्यासाठी  पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. डॉल्फिन सफरसाठी या परिसरतील हर्णे, मुरुड, पाळंदे याठिकाणी खास फायबर फेरिबोटींची देखील व्यवस्था स्थानिकांकडून केलेली आहे.  या परिसरामध्ये आलेला प्रत्येक पर्यटक डॉल्फिन बघितल्याशिवाय जातच नाही, अशी खासियत आहे. हा डॉल्फिन मासा समुद्रामध्ये उंच उडी घेऊन पुन्हा पाण्यात जातो हे दृश्य पाहताना पर्यटकांना वेगळाच आनंद मिळतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळेच  उद्योग लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायही बंद असून पर्यटकांची आवक पूर्णपणे थांबली आहे. नाहीतर या हंगामात डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली असती. परंतु हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याची कारण मिमांसा होऊन डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर आणणे गरजेचे बनले आहे. याठिकाणी दापोली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत डॉल्फिन जास्तच कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच समुद्रकिनारी खड्डा काढून त्याला पुरण्यात आले. यावेळी पाळंदे, सालदुरे परिसरातील ग्रामस्थ, प्रितम साठविलकर, दापोली वनाधिकारी बोराटे, कर्मचारी गणेश खेडेकर, सुरज जगताप, उपस्थित होते.