दापोली:- दापोली तालुक्यातील माटवण नवानगर येथील एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
सदर महिलेला पोटाचा त्रास होत असल्याने त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई येथे अधिक उपचारासाठी गेल्या होत्या तेथे त्यांनी सायन रुग्णालय व केईएम रुग्णालय येथे व एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतले त्यांना तीन दिवसापूर्वी रुग्णवाहिकेतून दापोलीत आणण्यात आले. दापोलीत आणल्या नंतर त्यांचा स्वॅब अधिक तपासणीकरिता पाठवण्यात आला. त्यांना तीन दिवस दापोली येथे आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांचा स्वॅब प्राप्त झाला असता त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता रत्नागिरी येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.