रत्नागिरी :- जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरीही उन्हाची काहीली वाढत असल्यामुळे 35 गावातील 58 वाड्यांना 11 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सुमारे साडेआठ हजार लोकांना टंचाईची झळ बसत आहे.
यंदा पाऊस लांबल्यामुळे टंचाईची तिव्रता कमी होईल असे चित्र होते. त्यानुसार परिस्थिती होती; परंतु गेल्या काही दिवसात उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे नदी, नाले कोरडे पडू लागले आहे. प्रत्येक आठवड्याला टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत आहे. त्यानुसार प्रांताधिकार्यांमार्फत टँकर सुरु करण्यास परवानगी दिली जात आहे. सर्वाधिक टँकर चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहेत. मागील आठवड्यात सुमारे दहा वाड्यांची भर पडली आहे. मे महिन्याच्या अखेरीस त्यात मोठी भर पडणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या नऊ तालुक्यांपैकी गुहागर, रत्नागिरी व राजापूर हे तिन तालुके अजूनपर्यंत टँकरमुक्त राहीले आहेत.
सद्यस्थितीत मंडणगड तालुक्यातील 2 गावातील 2 वाड्यांमध्ये दापोलीतील 5 गावातील 8 वाड्यांमध्ये, खेड तालुकयातील 7 गावातील 11 वाड्यांमध्ये, चिपळूण तालुक्यातील 9 गावातील 21 वाड्यांमध्ये, संगमेश्वर तालुक्यातील 9 गावातील 13 वाड्यामध्ये, लांजा तालुक्यातील 3 गावातील 3 वाड्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे.